You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
साबणाचे फुगे क्षणभंगुर असले तरी तेवढा क्षण लहान थोरांना आनंद देऊन जातो. विचारांचे पण तसेच असते. एखादा विचार मनात रुजला नाही तर तो क्षणात विरून जातो.
म्हणूनच अशा विचारांवर मनन करून मी चार गोष्टी लिहिल्या आहेत. वाचत असतांना कुणाला आधी अनुभवलेले कांहीतरी आठवेल. कुणाला कांही तरी नवीन कळेल. कुणाचे मनोरंजन होईल.
एक पर्यावरण अभियंता, शिक्षिका, गृहिणी आणि मुसाफिर असे मनोरंजक मिश्रण म्हणजे सुमन जोगळेकर. पर्यावरण हा त्यांचा हातखंडा विषय. घरगुती कचर्याच्या व्यवस्थापनाचे धडे त्यांनी पुष्कळांना घालून दिले आहेत. अगदी साध्या, सोप्या भाषेत विषय रंगवून सांगण्याची हातोटी त्यांना साधलेली आहे. हे विचारांचे बुडबुडे आपले मन मोहवून जातील.
अतिशय वाचनीय पुस्तक. दैनंदिन जीवनाच्या विविध अंगांच्या संबंधातील स्वानुभवांवर आधारित गप्पांच्या स्वरूपातील उपयुक्त माहिती छोट्या लेखांद्वारे वाचकांपर्यंत पोहचविण्याचा अत्यंत स्तुत्य प्रयत्न. लेखिका सुमन जोगळेकर यांना शुभेच्छा.
Re: विचारांचे बुडबुडे
"विचारांचे बुडबुडे" या सुमन जोगळेकर यांच्या पुस्तकातील कांही लेख मी वाचले. पुस्तकात एकूण ६५ लेख असून या लेखांना विषयाचे वावडे नाही कारण विचारांचे बुडबुडेच ते!
पतीच्या नोकरीच्या निमित्ताने देशातील विविध ठिकाणी वास्तव्य करण्याची संधी त्यांना मिळाली. विदेशातही त्यांनी भरपूर भ्रमंती केली. त्यामुळे भरपूर अनुभव त्यांच्या गाठी आहे.
स्वयंपाकघरातील वेळेचे नियोजन, सासू आणि सून, उखाणे असे अगदी रोजच्या जीवनाशी संबधित लेख या पुस्तकात आहेत. त्याबरोबरच जपानी उपाहारगृह, रिमोट कंट्रोल आणि अमेरिका, मृत समुद्र या लेखांमधून लिखिकेची निरीक्षणदृष्टि आणि जे पाहिले ते नेमक्या शब्दात मांडण्याचे कौशल्य दिसून येते. सामाजिक, पर्यावरण, आरोग्य या विषयांशी संबंधित लेखांमधून सामान्य माणसाने सजग राहून सामाजिक भान आणि कर्तव्ये निभावण्याची गरज या विषयीची लेखिकेची तळमळ जाणवते.
आपल्या प्रत्येकाच्याच मनात असे हे विचारांचे बुडबुडे अखंडपणे येत असतात. लेखिकेने ते शब्दबद्ध केले आहेत. नुकतीच लेखिकेशी माझी ओळख होऊन त्यांच्या सहवासाचा कांही तासांचा आनंदही लाभला.
"दिसामाजी कांही तरी लिहावे" या उक्तीनुसार त्यांनी हा लेखनप्रपंच चालू ठेवावा, अधिकाधिक लेखनासाठी यांना शुभेच्छा!