You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
स्वामी रामानंदतीर्थ यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने ज्ञान प्रबोधिनीच्या अंबाजोगाई विस्तार केंद्राचे पूर्णवेळ कार्यकर्ते अमोल पाटणकर व ज्येष्ठ सदस्य श्री. वि. र. जोशी यांनी स्वामीजींचे कथारूप चरित्र लिहिले .ज्ञान प्रबोधिनीचा सुवर्ण महोत्सव व स्वामी विवेकानंदांच्या दीडशेव्या जयंतीचे वर्ष या जोड-निमित्ताने या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन होत आहे.
स्वामी विवेकानंद - स्वामी रामतीर्थ - स्वामी रामानंदतीर्थ असा प्रेरणेचा एक प्रवाह आहे. स्वामी विवेकानंद - ज्ञान प्रबोधिनी असा प्रेरणेचा दुसरा प्रवाह आहे. या दोन्ही प्रवाहांमध्ये राष्ट्रधर्म' हा समान आशय आहे. त्यामुळेच १९७४ साली स्वामी रामतीर्थ जन्मशताब्दी साजरी करण्यामध्ये ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
सोलापूर व पुणे येथे स्वामी रामानंदतीर्थांचे वास्तव्य शिक्षणाच्या निमित्ताने होते. दोन्ही ठिकाणी ज्ञान प्रबोधिनीची केंद्रे आहेत. स्वामीजींनी हिप्परग्याच्या राष्ट्रीय शाळेत अध्यापन केले. हिप्परग्याच्या जवळच हराळीमध्ये ज्ञान प्रबोधिनीचे ग्रामीण केंद्र आहे. स्वामीजींच्या कामाचे केंद्र काही काळ अंबाजोगाईला होते. तिथेही ज्ञान प्रबोधिनीचे काम चालते. समान वैचारिक प्रेरणेबरोबरच समान भौगोलिक परिसर हा ही स्वामीजी आणि ज्ञान प्रबोधिनी यांच्यामधील नात्याचा एक बंध आहे.
सत्ताकांक्षा न ठेवता केलेल्या राजकारणाला ज्ञान प्रबोधिनीमध्ये 'देशकारण' असा शब्द वापरतो. 'देशकारण' करणे हा राष्ट्रधर्मा'च्या आचरणाचाच भाग आहे. कामगार चळवळ, शिक्षण, स्वातंत्र्य-चळवळ, लोकसंघटन ही सगळी देशकारणाचीच अंगे आहेत. या सर्वांना अध्यात्माची पार्श्वभूमी मिळाली की तेच देशकारण विवेकानंद-रामतीर्थ प्रणीत राष्ट्रधर्माचे आचरण बनते.
स्वामी रामतीर्थांचे चरित्र अशा राष्ट्रधर्माच्या आचरणाचा एक वर्तनादर्श (role-model) आहे. अगदी सोप्या शब्दात लिहिलेल्या या कथारूप चरित्राने अमूर्त असलेली देशकारणाची संकल्पना मूर्त स्वरूपात समोर उभी राहते. अशा चरित्रांच्या चिंतनातून आणि अनुसरणातूनच अमूर्त संकल्पना समजायला लागतात व आपल्या आयुष्यात काही प्रमाणात उतरवता येतात.
ज्ञान प्रबोधिनी पुणे केंद्रातर्फे विवेकानंद, निवेदिता, हरिसिंह नलुआ आणि ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै. वि. वि. पेंडसे यांची चरित्रे प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या वाचनातून जशी प्रेरणा मिळते तसाच परिणाम या चरित्राच्या वाचनाने छोट्या वयोगटासाठी आणि नवसाक्षरांसाठीही होऊ शकेल.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book कथा स्वामी रामानंद तीर्थांच्या.