Description
नवीन सुधारीत सचित्र दुसरी आवृत्ती.
‘भाबडे गुरुजींची विलक्षण पृथ्वीप्रदक्षिणा’ हे पुस्तक बॉम्बे बेटावरील श्रीमान भानुदास बबन डेमसे उर्फ भा.ब.डे. उर्फ भाबडे गुरुजींनी फुगेयानातून इ.स. १८८३ साली केलेल्या तरंगत्या पृथ्वी प्रदक्षिणेची विलक्षण काल्पनिक हकिकत आहे. त्यांची ही पृथ्वीप्रदक्षिणा अतिशय थरारक तर आहेच; पण प्रवासात अनेक विचित्र अविश्वनीय परिस्थितीला सामोरे जात असतानाच त्यांच्यावर अनेक संकटे कोसळली.
ही हकिकत आहे प्रवासात भाबडे गुरुजींना अकस्मात उतरावे लागलेल्या एका आश्चर्यकारक बेटाची, तेथे भेटलेल्या कल्पनातीत मित्रांची. त्या बेटावरील त्यांच्या आयुष्याची, बेटावरील त्यांच्या वास्तव्याच्या शेवटच्या दिवसाची, जो दिवस होता अत्यंत गडबडीचा, गोंधळाचा आणि अर्थातच मोठ्ठ्या कल्लोळाचा. भल्यामोठ्या आवाजाने, कल्लोळाने भरून राहिलेला जो दिवस भाबडे गुरुजींनी अनुभवला तसा दिवस आजपर्यंतच्या इतिहासात कोणाही दुसऱ्या मनुष्याच्या आयुष्यात आला नाही...
ही कथा आहे त्या बेटावरील ज्वालामुखीच्या ऐतिहासिक सर्वात मोठ्या स्फोटाची तसेच इतिहासातील आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या स्फोटात सापडल्यानंतर तेथून सुखरुप सुटकेसाठी बेटावरील रहिवाशांसोबत एका विचित्र यानातून केलेल्या त्यांच्या विलक्षण उड्डाणाची.
भाबडे गुरुजींची ही पृथ्वीप्रदक्षिणा व हे उड्डाण विलक्षण व काल्पनिक वाटले तरी, या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण वाचल्यानंतर या काल्पनिकतेतही वास्तव आहे हे तुम्हाला समजेल.
माणसाला ज्ञात असलेल्या सर्वप्रकारच्या फुगेयानातून मुक्त प्रवासाबद्दल तसेच आजपर्यंत अज्ञात असलेले फुग्यांच्या वायुयानाच्या बाबतीतील शोधही या पुस्तकात वाचायला मिळतील. इ. स. १७५० ते इ.स. १८९० या काळात जेव्हा अशी वायुयाने लोकप्रिय होती, त्याच काळात ही कथा घडली आहे.
पुस्तकातील बऱ्याच गोष्टी सत्य आहेत. त्यामुळेच गुरुजींच्या पृथ्वीप्रदक्षिणेच्या हकिकतीचा दुसरा काल्पनिक भागही प्रत्यक्षात घडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा या अर्ध्या अगदी प्रत्यक्षातील खऱ्या व अर्ध्या शक्य असलेल्या घटनांच्या काळात एका मराठी विज्ञान गुरुजींनी हा विलक्षण जगप्रवास करून अत्यंत कमी वेळात आपली पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली असण्याचीही दाट शक्यता आहे.
एप्रिल २०१८ मध्ये प्रकाशित ‘विलक्षण पृथ्वीप्रदक्षिणा’ या इ-पुस्तकाची ही नवीन सुधारीत सचित्र दुसरी आवृत्ती आहे.
स्नेहल यांचा जन्म १९४९ साली पश्चिम महाराष्ट्रातील ‘आटपाडी’ या छोट्या खेड्यात झाला. त्यांचे गरीब आईवडील फार शिक्षित नसले, तरी ते अतिशय बुद्धिमान व सुजाण होते आणि आपल्या मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानसमृद्ध करण्याची त्यांची इच्छा होती. ज्या काळी त्यांच्या समाजातील स्त्रियांना साधे प्राथमिक शिक्षण घेणेही शक्य नव्हते, त्याकाळी वडिलांच्या प्रोत्साहनामुळे आणि स्वत:च्या जिद्दीने प्रेरित होऊन, स्नेहल यांनी त्या पलीकडे जाऊन उच्चशिक्षण, त्यातही वैद्यकीय शिक्षण घेतले. पश्चिम महाराष्ट्रातील मिरज वैद्यकीय महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठातून, त्यांनी एम.बी.बी.एस ही वैद्यकीय पदवी व एमडी (मेडिसीन) ही पदव्युत्तर पदवी घेतली.
शिकण्याची व शिकविण्याची आवड तीव्र असल्याने, यात काहीच आश्चर्य नाही की, त्यांनी वैद्यकीय प्राध्यापिकेचे करिअर निवडले. प्रथम १९७६ पासून औषधवैद्यक विभागात रजिस्ट्रार असता त्यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकविले. नंतर स्वतः शिकलेल्या मिरज वैद्यकीय महाविद्यालयात रीतसर अधिव्याख्याती पद स्वीकारले. सन १९८२ मध्ये मुंबईच्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक पदावर रुजू झाल्यानंतर, कालांतराने त्या तेथे प्राध्यापक झाल्या आणि सन २००७ मध्ये तेथूनच ‘विभागप्रमुख’ या पदावरून निवृत्त झाल्या. अध्यापिकेच्या आपल्या कार्यकालात त्यांनी प्रशिक्षण देऊन तयार केलेले त्यांचे असंख्य विद्यार्थी, आज जगाच्या वेगवेगळ्या भागांत नामवंत डॉक्टर म्हणून वैद्यकीय प्रॅक्टिस करीत आहेत.
जवळजवळ ३३ वर्षांच्या आपल्या समाधानकारक वैद्यकीय कारकिर्दीनंतर २००७ मध्ये निवृत्त झालेल्या त्या आपल्या कारकिर्दीकडे प्रेमाने व अभिमानाने पाहतात. एक उत्कृष्ट डॉक्टर आणि उत्साही शिक्षिका म्हणून व्यतीत केलेली आपल्या कारकिर्दीची ही वर्षे त्यांना अत्यंत समाधान देऊन जातात.
आपले स्वत:चे करीअर करीत असता, आपल्या मुलामध्येही त्यांनी ज्ञानलालसा जागवली. त्याला सतत प्रेरणा देत, त्याचा उत्तम बौद्धिक विकास केला. लहानपणापासून त्याच्यात महत्वाकांक्षा चेतवत, स्वत:पेक्षाही जास्त उच्चशिक्षण घेण्याची संधी दिल्याने, त्यांच्या मुलाने अमेरिकेत एम. डी. (मेडिसीन) ही पदव्युत्तर पदवी व त्या पुढील फेलोशिप केल्यानंतर, आज तो ‘Infectious Diseases इन्फेक्शिअस डीसीजेस’ या क्षेत्रात कन्सल्टंट म्हणून अमेरिकेत कार्यरत आहे. गेल्या वर्षभरात जगभर पसरलेल्या कोव्हिड १९ च्या साथीमध्येही त्याने महत्वाचे योगदान दिले आहे व देत आहे.
शालेय जीवनापासून जबरदस्त ज्ञानलालसा व वाचनाची आवड असल्याने, अर्थातच लेखन करण्याची ऊर्मीही दीर्घकाळ मनात होती. वैद्यकीय प्राध्यापिकेच्या पूर्णवेळ व्यस्ततेमुळे वेळ न मिळाल्याने ती सुप्तच राहिली होती. ज्या ज्ञानलालसेतून त्यांनी अध्यापिकेचे करीअर निवडले, त्याच ज्ञानलालसेतून अखेरीस वैद्यकीय क्षेत्रातून निवृत्तीनंर, उर्वरित जीवनाला एक वेगळी दिशा देत, आवडीचे काम करीत आनंदी राहण्याचे ठरवून त्या लेखनाकडे वळल्या. १९५५-१९६६ या दशकात शालेय शिक्षण मायबोली मराठीतून झाल्याने, अर्थातच ‘माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।’ असे संत ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेल्या मराठी भाषेशी त्यांचे घट्ट नाते आहे. तसेच वाचनाने समृद्ध झालेली त्या भाषेतील विपुल शब्दसंपदा त्यांच्याकडे असल्याने, त्यांनी प्रथम २००७ मध्ये ‘आहार व आरोग्य’ या विषयावर सर्वसामान्यांसाठी लिहिलेल्या एका मराठी ब्लॉगपासून सुरुवात केली. त्यानंतर सन २०१० पासून मराठीत सर्जनशील कल्पनारम्य लेखन सुरू केले आणि आज त्यांनी स्वत:चे रूपांतर एक नामवंत सर्जनशील लेखिकेमध्ये केले आहे. सन २०१४ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने छापील स्वरुपात प्रकाशित केलेली ‘कायापालट’ ही त्यांची पहिली मराठी कादंबरी. त्यानंतर अज्ञातवास (कादंबरी), अनाकलनीय (गूढकथासंग्रह), आद्यकर्मी इलिजाबेथ (चरित्र), अंतरिक्षातून (अंतरिक्षकथा) विलक्षण पृथ्वीप्रदक्षिणा (साहसी फुगेयान प्रवास), हरवलेली (साहसी जलप्रवास), अजब मुलांच्या गजब कथा (किशोरकथा) इत्यादी सह अनेक मराठी पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांची बहुतेक सर्व पुस्तके ॲमेझॉन किंडलवर ई-बुक्स म्हणून उपलब्ध आहेत.
त्यांचे सर्वात मोठे लेखनकार्य, ज्याला magnum opus म्हणता येईल ते आहे, डॉ. इलिझाबेथ ब्लॅकवेल या एकोणिसाव्या शतकातील एका आद्यकर्मी (पायोनिअर Pioneer) स्त्रीचे चरित्र. ज्या एकोणिसाव्या शतकात स्त्रियांना प्राथमिक शिक्षणही उपलब्ध नव्हते व वैद्यकीय शिक्षण तर वर्जच होते, त्या शतकाच्या मध्यात इलिजाबेथ ब्लॅकवेल या स्त्रीने सर्व सामाजिक अडचणींविरुद्ध प्रयत्न करून वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला व आधुनिक वैद्यकाची ती जगातील ‘प्रथम महिला डॉक्टर’ बनली. अशा या इलिझाबेथच्या जीवनकथेने, तशाच परिस्थितीतून गेलेल्या स्नेहलच्या मनाची पकड घेतली नसेल तरच आश्चर्य! अशा या आद्यकर्मी इलिजाबेथच्या मराठी चरित्राला स्नेहलशिवाय कोण अधिक चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकेल! तिच्या कथेपासून प्रेरित होऊन, स्नेहलने तिचे जीवनचरित्र मराठीत लिहिले आहे. या चरित्रामुळे मराठी तरुणांच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळेल आणि त्यांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल अशी त्यांना आशा आहे.