You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
श्रीमद्भगवद्गीता (किंवा नुसतीच गीता) म्हणजे भारतीय शास्त्रग्रंथांमधील एक सर्वात पूजनीय व सन्मान्य असा ग्रंथ आहे, ज्यात भारतीय सनातन आध्यात्मिक परंपरेचे सर्वोच्च तत्त्वज्ञान सर्वंकषपणे मांडलेले आहे. असे मानले जाते की गीता ही प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर महाभारत युद्धाआधी सांगितली. कौरव व पांडवांमधील युद्ध सुरु होणार असतांनाच, अचानक अर्जुनाला मोहाने ग्रासले व कौरवसैन्यातील आपल्याच वडीलधारी माणसांना, गुरुजनांना, इतर आप्तवकीयांना आपण मारायला निघालो आहोत हे योग्य नव्हे असे त्याला वाटले. त्यामुळे त्याने आपली शस्त्रे खाली ठेवली आणि अत्यंत विषादपूर्ण अवस्थेत तो रथात खाली बसला. त्याने श्रीकृष्णांना आपल्या स्थितीचे समर्थन देण्याचा प्रयत्न केला, पण श्रीकृष्णांना ते अजिबात पटले नव्हते, हे जेव्हां अर्जुनाच्या लक्षात आले, तेव्हां त्याने श्रीकृष्णांना विनंति केली की त्यांनीच मित्र व हितचिंतक या नात्याने अर्जुनाला मार्ग दाखवावा. श्रीकृष्णांनी प्रथम थोडक्यात सनातन तत्त्वज्ञान समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तरी अर्जुनाचे मन वळत नव्हते हे पाहून मग श्रीकृष्णांनी सविस्तरपणे सर्व गूढ आध्यात्मिक तत्त्वज्ञान उपनिषदांच्या साररूपात अर्जुनापुढे उकलले, जे श्रीमद्भगवद्गीता म्हणून सर्वच जगाला पुढे उपलब्ध झाले. श्रीकृष्णांकडून अशा प्रकारे गुरूपदेशच अर्जुनाला प्राप्त झाला आणि मग त्याचा आधीचा मोह सर्वस्वी नष्ट होऊन अर्जुन युद्धाचे प्राप्त कर्म करण्यास तयार झाला. यातून आपल्याला हे कळते की सद्गुरूंची शिष्याच्या उद्धारात किती परिणामकारक भूमिका असते. जसे श्रीकृष्ण गीतेचे प्रतिपादन करत जातात, तसे आपल्या लक्षात येते की अर्जुन व श्रीकृष्ण यांच्यातील संबंध कसा बदलत गेला. प्रथम, अर्जुन श्रीकृष्णांना केवळ आपला एक नातेवाईक व सखा समजत होता. पुढे, जसजसे गीतेचे तत्त्वज्ञान श्रीकृष्ण सांगत जातात, तसतसे अर्जुनाच्या लक्षात येते की श्रीकृष्ण प्रत्यक्ष भगवंतच आहेत आणि मग तो श्रीकृष्णांना गुरु म्हणून स्वीकारतो. श्रीकृष्णाचे सुद्धा अर्जुनावर नितांत प्रेम असल्यामुळे त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावून अर्जुनाला गुरूपदेश केला. श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपले विश्वरूप दाखवून आपण प्रत्यक्ष भगवंतच असल्याचे प्रमाणच दिले आणि असे हे सर्व पाहिल्या ऐकल्यानंतर अर्जुनाचा मोह सर्वस्वी नष्ट झाला यात कांहीच आश्चर्य नाही.
हे पुस्तक म्हणजे लेखकाला गीतेतील तत्त्वज्ञान जसे समजले व भावले त्याचे व्यावहारिक सार आहे. गीतेत मांडलेले तत्त्वज्ञान हे कोणालाही आणि जीवनातील कोणत्याही परिस्थितीत कसे वागावे याबाबतीत उत्तम मार्गदर्शन करू शकते. अर्थात, गीतेतील सर्व कांही सर्वांनाच नेहमीच लागू होईल असे नाही. पण कोणीही प्राप्त परिस्थितीत त्याला उपयोगी असे तत्त्वज्ञान गीतेतून नक्कीच मिळवू शकतो. निरनिराळ्या स्वभावांच्या व्यक्तींना योग्य असे वेगवेगळे आध्यात्मिक मार्ग गीतेत प्रतिपादलेले आहेत. गीतेचे एक शक्तिस्थान हे की सामुदायिक धर्म या संकल्पनेला त्यात अजिबात स्थान नाही, म्हणजे पुण्य व पाप आणि त्यानुसार मरणोत्तर स्वर्गात किंवा नरकात जावे लागणे यासारख्या कल्पनांना त्यात महत्त्व नाही. सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहंत्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच: ॥ गीता १८:६६). त्याऐवजी, गीतेचा केंद्रबिंदु व्यक्तिगत स्वधर्म या संकल्पनेवर आहे, ज्याच्या द्वारे मनुष्य सच्चिदानंदरूप होऊन मुक्त होतो. स्वधर्मात काय करावे आणि काय करू नये याबाबत कोणत्याही प्रकारचे नियम नाहीत. तर स्वधर्म म्हणजे प्रत्येक व्यक्तीने त्याच्या स्वभावानुसार, परिस्थितिनुसार, बुद्धिशक्तिनुसार जे कर्म योग्य वाटेल, ते ईश्वरानुसंधानात राहून करणे. याच नाण्याची दुसरी बाजू ही की इतरांशी तुलना न करणे व आपल्या वाट्याला जे येईल ते सुखाने भोगणे. तसेच, भविष्यात काय होईल याची चिंता न करता, केवळ वर्तमानात कर्म करत राहावे. दुसर्याा शब्दात, स्वधर्मात कर्म कोणते योग्य किंवा अयोग्य यापेक्षा ते करतांना ठेवण्याची वृत्ति महत्त्वाची. म्हणूनच गीतेतील "कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा संग: अस्तु अकर्मणि॥" (गीता २:४७) हा संदेश मध्यवर्ति आहे व तो सुवर्णाक्षरात लिहून सतत व सहज दिसेल अशा जागी घरात व कार्यालयात लावण्याच्या योग्यतेचा आहे. याचा अर्थ असा की फक्त कर्म करणे आपल्या हाती आहे, कर्माच्या फळावर आपला कोणताही अधिकार नसतो. तसेच, फळावर नजर ठेवून कर्म करू नये आणि कर्म न करण्याची इच्छा पण असू नये (कर्म सोडू नये). गीतेमध्ये कर्मकांडाला अजिबात महत्त्व दिलेले नाही. देवाची पूजा किंवा भक्ति करण्याची कोणतीही विशिष्ट पद्धत किंवा त्यासाठी वापरण्याचे साहित्य याला कांहीच महत्त्व नसून आपला भाव महत्त्वाचा, असे श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात (पत्रं पुष्पं फलं तोयं य: मे भक्त्या प्रयच्छति। तदहं भक्त्युमपहृतमश्नामि प्रयतात्मन:॥ गीता ९:२६). यामुळेच गीतेचे तत्त्वज्ञान धर्मातीत आहे.
गीतेतील शेवटचा श्लोक (यत्र योगेश्वरकृष्ण: यत्र पार्थोधनुर्धर: । तत्र श्रीर्विजयो भूतिर्धृवा नीतिर्मतिर्मम॥ गीता १८:७८) हा पूर्णोद्गार समजला जातो. यात गीतेच्या सर्व तत्त्वज्ञानाचे सार आहे असे सांगितले जाते. या श्लोकाचा मथितार्थ असा की श्रीकृष्ण हा भगवंतांचा पूर्णावतार असल्यामुळे, त्यांनी गीतारूपाने अर्जुनाला गुरूपदेश दिल्यानंतर, अर्जुन सुद्धा भगवत्स्वरूप होऊन गेला. याच्या परिणामस्वरूप, पांडवांचा दोन प्रकारे फायदा झाला - श्रीकृष्ण व अर्जुन दोघे ही भगवत्स्वरूप असून युद्धात त्यांच्या बाजूने होते आणि म्हणून त्यांचा विजय निश्चित होता. आपणा सर्वसामान्य भक्तांच्या दृष्टीने याचा अर्थ असा की जर आपल्यावर सद्गुरुकृपा झाली, तर आपण सुद्धा ऐहिक जीवनाच्या लढाईत विजयी होऊ, ऐहिक अर्थाने नव्हे, तर आध्यात्मिक अर्थाने. जीवनाच्या टक्क्याटोणप्यातून आपण सुखरूप बाहेर निघू.
या पुस्तकातील प्रकरणे गीतेतील निरनिराळ्या आध्यात्मिक संकल्पनांवर आधारलेली आहेत. बर्याच तत्त्वज्ञानांमध्ये एक गूढ संकलपना समजाविण्यासाठी दुसर्या तितक्याच गूढ संकल्पनेचा उपयोग केला जातो आणि त्याच्या परिणामस्वरूप तत्त्वज्ञान पुस्तकी राहाते, त्याचा व्यावहारिक उपयोग काय हे बहुतेक लोकांना कळत नाही! म्हणून, या पुस्तकात लेखकाने संकल्पना अशा पद्धतीने मांडल्या आहेत की त्यांचा व्यवहारात आणि प्रत्यक्ष सामान्य ऐहिक जीवनात कशा पद्धतीने उपयोग करता येईल ते स्पष्ट व्हावे. लेखकाचे असे स्पष्ट आकलन आहे की जीवन जसे चालते तसे ते चालणारच, कधी कडू तर कधी गोड अनुभव येतच राहाणार. पण त्यांच्याकडे पहाण्याचा आपला दृष्टिकोण योग्य असला की जीवन सुसह्य होते. आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा जीवनात उपयोग हा योग्य मानसिक दृष्टिकोण बाणविण्यासाठी व्हायला हवा.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book गीतासार - मला रुचले भावलेले.