You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
‘शोध अज्ञातांचा’ ही एक अंतराळ विज्ञानाशी संबंधित कथा आहे. या कथेतून अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपणास मिळतील ज्यांचा शोध आपणास अगदी बालपणापासून होता. आपल्या इतिहासातील अनेक घटना व सद्य काळातील वैज्ञानिक प्रगती यामध्ये असणारा दुवा आपणास बरेचदा गवसत नाही. पुरातन काळात ज्या अनेक प्रगत संस्कृती होऊन गेल्यात त्या आणि त्यानंतरच्या मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रवासातील काही दुवे सापडत नाहीत. पुरातन काळात अनेक अद्भुतरम्य शस्त्र, यंत्र,विमाने यांचा उल्लेख आढळतो.
मायान संस्कृतीतील मानवांनी अंतराळातील अनेक ग्रहांचा आणि ताऱ्यांचा शोध लावल्याचा उल्लेख आढळतो. त्या काळातील कालमापक यंत्र आणि आजचे घड्याळ हे एकमेकांशी मोठे साधर्म्य राखून आहेत. त्यावेळीही एका तासाची साठ मिनिटे आणि एका मिनिटाचे साठ सेकंद अशी विभागणी केली होती. वर्तुळाचे विभाजन ३६० अंशामध्ये करता येते याचा उल्लेख देखील त्या काळातील साहित्यात सापडतो. मायान संस्कृतीमध्ये तयार केलेल्या कॅलेंडर मध्ये ३६५ दिवसांचे एक वर्ष असेच कालमान होते. त्यांनी लीप ईयरची संकल्पना देखील आत्मसात केली होती. अचानकपणे अशी आधुनिक आणि प्रगत संस्कृती गूढरीत्या नष्ट झाली.
त्या संस्कृतीत आणि नंतरच्या संस्कृतीत झालेल्या विकासामध्ये मोठी दरी आढळते.त्या काळातील प्रगत संस्कृती अचानक कोठे लोप पावली?
पिरॅमिड सारखी अनेक भूमितीय वास्तुशिल्पे ख्रिस्तपूर्वकाळातील लोकांनी नेमक्या कोणत्या उद्देशाने निर्माण केलीत? पिरॅमिड्स केवळ त्या काळातील इजिप्शियन राज्यकर्त्यांच्या कबरी होत्या काय? एवढी अवजड शिल्पे उभारणे अत्याधुनिक यंत्र सामुग्रीशिवाय शक्य होते काय?........
देवाचा धावा करितांना आपण आकाशाकडेच का बघतो? देव पृथ्वीवर कोठून येत होते? अवकाशात स्वर्ग होता काय? असे अनेक प्रश्न आहेत की ज्यांची नेमकी उत्तरे आपणास सापडत नाहीत. त्या प्रश्नांचे सोडाच, पण आपल्या पृथ्वीबद्दल देखील आपणास बऱ्याच अंशी अज्ञान आहे. पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर हे मानवी आयुष्यास पूरक आहे. पृथ्वीचे वैविध्य हे पृथ्वीला सुंदर आणि राहण्यास योग्य बनविते. या अनेक वैविध्यांपैकी एक जरी गोष्ट बदलली तरी त्याचा मानवी आयुष्यावर परिणाम होईल काय? उदाहरणार्थ जर पृथ्वीचा भू-चुंबकीय गुणधर्मच नष्ट झाला तर काय होईल याची कोणी कल्पना करू शकतो काय? अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मानवाच्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत.
भारतीय अंतराळ विज्ञान संशोधन (ISRO) केंद्रात कार्यरत असलेल्या दोन तरुण आणि तल्लख बुद्धी असलेल्या शास्त्रज्ञांना अशा अनेक प्रश्नांनी हैराण केले होते. त्यांनी या सगळ्या गोष्टींचा छडा लावण्याचा चंग बांधला होता. ते प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक वेगवान संदेश वहन प्रणाली विकसित करतात. त्यामुळे अतिशय वेगाने अनेक घटना घडतात. त्या तरुण शास्त्रज्ञांचा पृथ्वीपासून अनेक प्रकाशवर्ष दूर स्थित असलेल्या अतिप्रगत अशा संस्कृतीशी संपर्क होतो. त्या संस्कृतीतील लोकांची वैज्ञानिक प्रगती ही मानवाच्या प्रगतीच्या मानाने अनेक युगे पुढे आहे. वास्तविक पाहता मानव ही त्यांचीच निर्मिती असते. मानवाच्या संरक्षणासाठी त्यांनी पृथ्वीभोवती वातावरणाचे कवच निर्माण केलेले असते.
एक दुसरी अतिप्रगत, दुष्ट विचार आणि दुष्ट इरादे असलेली संस्कृती देखील पृथ्वीच्या संपर्कात असते. पृथ्वीवरील मानववंशाचा समूळ नाश करण्याच्या इराद्याने त्यांचे कारस्थान पृथ्वीवरील अज्ञात स्थळी सुरु देखील असते............
शोध अज्ञातांचा या कथेत लेखकाने अनेक अतर्क्य घटनांचा उलगडा केलेला आहे. या कथेत वाचकांना अगदी त्यांच्या बालपणापासून पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील.............
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book शोध अज्ञातांचा.