You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution

Add a Review

कायापालट (eBook)

Type: e-book
Genre: Romance, Teens
Language: Marathi
Price: ₹150
(Immediate Access on Full Payment)
Available Formats: PDF, EPUB

Description

‘कायापालट’
नवीन सुधारीत आवृत्ती
‘प्रत्येक मनुष्याचं आपलं स्वत:चं असं एक स्वतंत्र जग असतं, जे ज्याच्या त्याच्या जीवनाबरोबरच संपतं. इतर, जे त्या जगाचा भाग असतात त्या इतरांसाठीही ते जग त्याबरोबरच संपतं; पण त्यांचं जीवन मात्र संपत नाही. त्या दु:खद परिस्थितीचा धीरानं सामना करून स्वत:साठी पुन्हा एक वेगळं जग निर्माण करीत त्यांना आपलं जीवन जगावं लागतं.’
“बेचाळीस वर्षे झालीत आज त्या गोष्टीला. त्यावर्षी जे काही घडलं त्याची स्मृती बारीकसारीक तपशिलांसह पूर्ण तारीखवार आजही माझ्या मनात कायम आहे. जे घडलं ते जसंच्या तसं माझ्या मनात सतत पुन्हापुन्हा घडतं. मनातल्या मनात ते आयुष्य जिवंत होतं. त्यावेळी मला जेवढं दु:ख झालं तेवढंच दु:ख आजही होतं. जेवढा आनंद तेव्हा झाला तेवढाच आनंद आजही होतो. या दोन्हीं भावनांचा एकत्रित असा एक विचित्र अनुभव मी नेहमीच घेतो. त्या स्मृती आता माझ्याबरोबरच संपतील.
कधीकधी वाटतं, काळाचं चक्र जर मला उलट फिरवता आलं असतं तर! वाटतं त्या घटनांमधलं दु:ख मी काढून टाकलं असतं; पण – पण मी जर असं केलं तर मग त्यातला आनंदही निघून जाईल. म्हणूनच मग स्मृती जशा येतात तसाच मी त्यांचा पुन:प्रत्यय घेतो. त्या घटनांनी जो मार्ग मला तेव्हा दाखवला, तोच मार्ग त्या आताच्या माझ्या आयुष्यात दाखवतात. तोच मार्ग अनुसरण्याचा मी प्रयत्न करतो.
“आता जी मी सांगणार आहे, ती आहे या कॉलेजकुमार विशाल पटनाईकचीच कहाणी आणि ती सांगताना आज मी काहीही हातचं राखून ठेवणार नाही.
काहीजणांना नक्की वाटेल की, या कॉलेजकुमाराची कहाणी काय ऐकायची? घर-कॉलेज, अभ्यास-परीक्षा, खेळ-स्पर्धा, मित्रांसोबत दंगा-मस्ती, हुंदडणं, तक्रारी, मुलींची छेडछाड या शिवाय यात असणार काय आहे? खरं आहे तुमचं म्हणणं. या वयात हेच तर सारं असतं! पण, याशिवायही काहीतरी आहे माझ्या कहाणीत. असं काही ज्यानं माझ्या जीवनात उत्पात घडवला. माझं पूर्ण जीवनच ढवळून काढलं!
माझ्या जीवनाची दिशाच बदलून टाकली!”
‘कायापालट’ ही ओडिशात चिल्का या नयनरम्य सरोवराच्या किनाऱ्यावरील खेड्यातील, नंतर गोर-गरिबांचा डॉक्टर म्हणून प्रसिद्ध झालेल्या डॉ. विशाल पटनाईकची कथा. वरकरणी कथा अत्यंत साधी. खेड्यातील संथ लयीतील जीवनाप्रमाणेच; पण एखाद्या धीरगंभीर लकेरीप्रमाणे प्रवास करणारी.
विशाल, हा या कादंबरीचा नायकच निवेदक आहे. तो केंद्रीय मंत्र्याचा मुलगा. गावातच शिकणारा. ज्योती महापात्रा ही सनातन महापात्रा या विशालच्याच प्राध्यापकांची मुलगी. साधी, देवभोळी व सतत हाती गीतेचा ग्रंथ बाळगणारी, दैवगतीवर विलक्षण विश्वास असणारी, म्हणून सर्वांनाच हास्यास्पदही वाटणारी. प्रा. महापात्रा हे विशालसहितच्या टारगट मुलांचे टार्गेट. त्यांनीच लिहिलेल्या पिग्मेलिअनच्या जगप्रसिद्ध मिथकावरील नाटकात प्रसंगवशात विशाललाच पिग्मेलिअनची भूमिका करावी लागते. गॅलेटिया बनते ज्योती.
येथून कादंबरी विलक्षण वळणे घेत पुढे सरकते. निस्वार्थ व खऱ्या प्रेमात इतकी प्रचंड शक्ती आहे की, जगप्रसिद्ध ग्रीक शिल्पकार पिग्मेलिअनच्या अजरामर प्रीतीमुळे त्याने बनवलेला निर्जीव पुतळाही सजीव होतो, हे मिथक अत्यंत वेगळ्या पद्धतीने संपूर्ण कथानक व्यापून उरते आणि त्याची नाळ मानवाच्या चीरवेदनांशी येऊन ठेपली आहे.
भग्वद्गीताही या कादंबरीत एका प्रतीकासारखी अवतरते. पिग्मेलिअनचे मिथक, अजरामर असले तरी ते शारीर...आणि गीता हे अशारीर अमरतेचे प्रतीक या अर्थाने लेखिकेने वापरले, यातच या कादंबरीतील प्रगल्भ वैश्विक व साहित्यिक दृष्टी दिसून येते. ही कादंबरी वाचकांना प्रगल्भ करण्यास नक्कीच मदत करेल.

About the Author

स्नेहल यांचा जन्म १९४९ साली पश्चिम महाराष्ट्रातील ‘आटपाडी’ या छोट्या खेड्यात झाला. त्यांचे गरीब आईवडील फार शिक्षित नसले, तरी ते अतिशय बुद्धिमान व सुजाण होते आणि आपल्या मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानसमृद्ध करण्याची त्यांची इच्छा होती. ज्या काळी त्यांच्या समाजातील स्त्रियांना साधे प्राथमिक शिक्षण घेणेही शक्य नव्हते, त्याकाळी वडिलांच्या प्रोत्साहनामुळे आणि स्वत:च्या जिद्दीने प्रेरित होऊन, स्नेहल यांनी त्या पलीकडे जाऊन उच्चशिक्षण, त्यातही वैद्यकीय शिक्षण घेतले. पश्चिम महाराष्ट्रातील मिरज वैद्यकीय महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठातून, त्यांनी एम.बी.बी.एस ही वैद्यकीय पदवी व एमडी (मेडिसीन) ही पदव्युत्तर पदवी घेतली.
शिकण्याची व शिकविण्याची आवड तीव्र असल्याने, यात काहीच आश्चर्य नाही की, त्यांनी वैद्यकीय प्राध्यापिकेचे करिअर निवडले. प्रथम १९७६ पासून औषधवैद्यक विभागात रजिस्ट्रार असता त्यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकविले. नंतर स्वतः शिकलेल्या मिरज वैद्यकीय महाविद्यालयात रीतसर अधिव्याख्याती पद स्वीकारले. सन १९८२ मध्ये मुंबईच्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक पदावर रुजू झाल्यानंतर, कालांतराने त्या तेथे प्राध्यापक झाल्या आणि सन २००७ मध्ये तेथूनच ‘विभागप्रमुख’ या पदावरून निवृत्त झाल्या. अध्यापिकेच्या आपल्या कार्यकालात त्यांनी प्रशिक्षण देऊन तयार केलेले त्यांचे असंख्य विद्यार्थी, आज जगाच्या वेगवेगळ्या भागांत नामवंत डॉक्टर म्हणून वैद्यकीय प्रॅक्टिस करीत आहेत.
जवळजवळ ३३ वर्षांच्या आपल्या समाधानकारक वैद्यकीय कारकिर्दीनंतर २००७ मध्ये निवृत्त झालेल्या त्या आपल्या कारकिर्दीकडे प्रेमाने व अभिमानाने पाहतात. एक उत्कृष्ट डॉक्टर आणि उत्साही शिक्षिका म्हणून व्यतीत केलेली आपल्या कारकिर्दीची ही वर्षे त्यांना अत्यंत समाधान देऊन जातात.
आपले स्वत:चे करीअर करीत असता, आपल्या मुलामध्येही त्यांनी ज्ञानलालसा जागवली. त्याला सतत प्रेरणा देत, त्याचा उत्तम बौद्धिक विकास केला. लहानपणापासून त्याच्यात महत्वाकांक्षा चेतवत, स्वत:पेक्षाही जास्त उच्चशिक्षण घेण्याची संधी दिल्याने, त्यांच्या मुलाने अमेरिकेत एम. डी. (मेडिसीन) ही पदव्युत्तर पदवी व त्या पुढील फेलोशिप केल्यानंतर, आज तो ‘Infectious Diseases इन्फेक्शिअस डीसीजेस’ या क्षेत्रात कन्सल्टंट म्हणून अमेरिकेत कार्यरत आहे. गेल्या वर्षभरात जगभर पसरलेल्या कोव्हिड १९ च्या साथीमध्येही त्याने महत्वाचे योगदान दिले आहे व देत आहे.
शालेय जीवनापासून जबरदस्त ज्ञानलालसा व वाचनाची आवड असल्याने, अर्थातच लेखन करण्याची ऊर्मीही दीर्घकाळ मनात होती. वैद्यकीय प्राध्यापिकेच्या पूर्णवेळ व्यस्ततेमुळे वेळ न मिळाल्याने ती सुप्तच राहिली होती. ज्या ज्ञानलालसेतून त्यांनी अध्यापिकेचे करीअर निवडले, त्याच ज्ञानलालसेतून अखेरीस वैद्यकीय क्षेत्रातून निवृत्तीनंर, उर्वरित जीवनाला एक वेगळी दिशा देत, आवडीचे काम करीत आनंदी राहण्याचे ठरवून त्या लेखनाकडे वळल्या. १९५५-१९६६ या दशकात शालेय शिक्षण मायबोली मराठीतून झाल्याने, अर्थातच ‘माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।’ असे संत ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेल्या मराठी भाषेशी त्यांचे घट्ट नाते आहे. तसेच वाचनाने समृद्ध झालेली त्या भाषेतील विपुल शब्दसंपदा त्यांच्याकडे असल्याने, त्यांनी प्रथम २००७ मध्ये ‘आहार व आरोग्य’ या विषयावर सर्वसामान्यांसाठी लिहिलेल्या एका मराठी ब्लॉगपासून सुरुवात केली. त्यानंतर सन २०१० पासून मराठीत सर्जनशील कल्पनारम्य लेखन सुरू केले आणि आज त्यांनी स्वत:चे रूपांतर एक नामवंत सर्जनशील लेखिकेमध्ये केले आहे. सन २०१४ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने छापील स्वरुपात प्रकाशित केलेली ‘कायापालट’ ही त्यांची पहिली मराठी कादंबरी. त्यानंतर अज्ञातवास (कादंबरी), अनाकलनीय (गूढकथासंग्रह), आद्यकर्मी इलिजाबेथ (चरित्र), अंतरिक्षातून (अंतरिक्षकथा) विलक्षण पृथ्वीप्रदक्षिणा (साहसी फुगेयान प्रवास), हरवलेली (साहसी जलप्रवास), अजब मुलांच्या गजब कथा (किशोरकथा) इत्यादी सह अनेक मराठी पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांची बहुतेक सर्व पुस्तके ॲमेझॉन किंडलवर ई-बुक्स म्हणून उपलब्ध आहेत.
त्यांचे सर्वात मोठे लेखनकार्य, ज्याला magnum opus म्हणता येईल ते आहे, डॉ. इलिझाबेथ ब्लॅकवेल या एकोणिसाव्या शतकातील एका आद्यकर्मी (पायोनिअर Pioneer) स्त्रीचे चरित्र. ज्या एकोणिसाव्या शतकात स्त्रियांना प्राथमिक शिक्षणही उपलब्ध नव्हते व वैद्यकीय शिक्षण तर वर्जच होते, त्या शतकाच्या मध्यात इलिजाबेथ ब्लॅकवेल या स्त्रीने सर्व सामाजिक अडचणींविरुद्ध प्रयत्न करून वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला व आधुनिक वैद्यकाची ती जगातील ‘प्रथम महिला डॉक्टर’ बनली. अशा या इलिझाबेथच्या जीवनकथेने, तशाच परिस्थितीतून गेलेल्या स्नेहलच्या मनाची पकड घेतली नसेल तरच आश्चर्य! अशा या आद्यकर्मी इलिजाबेथच्या मराठी चरित्राला स्नेहलशिवाय कोण अधिक चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकेल! तिच्या कथेपासून प्रेरित होऊन, स्नेहलने तिचे जीवनचरित्र मराठीत लिहिले आहे. या चरित्रामुळे मराठी तरुणांच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळेल आणि त्यांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल अशी त्यांना आशा आहे.

Book Details

ISBN: 9781311972033
Publisher: शब्दविश्व प्रकाशन, नवी मुंबई
Number of Pages: 170
Availability: Available for Download (e-book)

Ratings & Reviews

कायापालट

कायापालट

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book कायापालट.

Other Books in Romance, Teens

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.