Description
निलेश नावाच्या एका व्रात्य शाळकरी मुलाच्या खोडकरपणामुळे त्याच्यावर काय प्रसंग ओढवतात, हे यातील तीन गोष्टींमध्ये वाचता येईल.
१. निल्लु आणि बिल्लु : थोडासा क्रूर व खोडकर शाळकरी मुलगा निलेश उर्फ निल्लु आपल्या पाळीव मांजराला 'बिल्लु'ला क्रूरपणे वागवत असतो. त्यामुळे त्याचे पप्पा त्याला डॉ. कानपिळेंच्या सुधारशाळेत पाठविण्याचे ठरवितात. अचानक त्याच्या आयुष्यात एक विचित्र घटना घडते, ज्यामुळे त्याचे आयुष्य बदलून जाते. त्याचे आयुष्य बदलून टाकणारी ती विचित्र घटना काय? ते जाणण्यासाठी वाचा ही कथा...
२. बिल्लु आणि रोहू : निलेशच्या काही दोष नसताना त्याच्यावर चोरीचा आळ येतो आणि हरवलेली वस्तू शोधण्याच्या प्रयत्नात तो एका तलावात पडतो. त्यानंतर त्याला काय अनुभव येतो हे या कथेत वाचता येईल.
३. निल्लु आणि आग : निलेशला त्याचे नातेवाईक भीत्रा व नेभळट समजतात. पण तो तसा आहे का? हे या कथेत वाचता येईल.
स्नेहल यांचा जन्म १९४९ साली पश्चिम महाराष्ट्रातील ‘आटपाडी’ या छोट्या खेड्यात झाला. त्यांचे गरीब आईवडील फार शिक्षित नसले, तरी ते अतिशय बुद्धिमान व सुजाण होते आणि आपल्या मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानसमृद्ध करण्याची त्यांची इच्छा होती. ज्या काळी त्यांच्या समाजातील स्त्रियांना साधे प्राथमिक शिक्षण घेणेही शक्य नव्हते, त्याकाळी वडिलांच्या प्रोत्साहनामुळे आणि स्वत:च्या जिद्दीने प्रेरित होऊन, स्नेहल यांनी त्या पलीकडे जाऊन उच्चशिक्षण, त्यातही वैद्यकीय शिक्षण घेतले. पश्चिम महाराष्ट्रातील मिरज वैद्यकीय महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठातून, त्यांनी एम.बी.बी.एस ही वैद्यकीय पदवी व एमडी (मेडिसीन) ही पदव्युत्तर पदवी घेतली.
शिकण्याची व शिकविण्याची आवड तीव्र असल्याने, यात काहीच आश्चर्य नाही की, त्यांनी वैद्यकीय प्राध्यापिकेचे करिअर निवडले. प्रथम १९७६ पासून औषधवैद्यक विभागात रजिस्ट्रार असता त्यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकविले. नंतर स्वतः शिकलेल्या मिरज वैद्यकीय महाविद्यालयात रीतसर अधिव्याख्याती पद स्वीकारले. सन १९८२ मध्ये मुंबईच्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक पदावर रुजू झाल्यानंतर, कालांतराने त्या तेथे प्राध्यापक झाल्या आणि सन २००७ मध्ये तेथूनच ‘विभागप्रमुख’ या पदावरून निवृत्त झाल्या. अध्यापिकेच्या आपल्या कार्यकालात त्यांनी प्रशिक्षण देऊन तयार केलेले त्यांचे असंख्य विद्यार्थी, आज जगाच्या वेगवेगळ्या भागांत नामवंत डॉक्टर म्हणून वैद्यकीय प्रॅक्टिस करीत आहेत.
जवळजवळ ३३ वर्षांच्या आपल्या समाधानकारक वैद्यकीय कारकिर्दीनंतर २००७ मध्ये निवृत्त झालेल्या त्या आपल्या कारकिर्दीकडे प्रेमाने व अभिमानाने पाहतात. एक उत्कृष्ट डॉक्टर आणि उत्साही शिक्षिका म्हणून व्यतीत केलेली आपल्या कारकिर्दीची ही वर्षे त्यांना अत्यंत समाधान देऊन जातात.
आपले स्वत:चे करीअर करीत असता, आपल्या मुलामध्येही त्यांनी ज्ञानलालसा जागवली. त्याला सतत प्रेरणा देत, त्याचा उत्तम बौद्धिक विकास केला. लहानपणापासून त्याच्यात महत्वाकांक्षा चेतवत, स्वत:पेक्षाही जास्त उच्चशिक्षण घेण्याची संधी दिल्याने, त्यांच्या मुलाने अमेरिकेत एम. डी. (मेडिसीन) ही पदव्युत्तर पदवी व त्या पुढील फेलोशिप केल्यानंतर, आज तो ‘Infectious Diseases इन्फेक्शिअस डीसीजेस’ या क्षेत्रात कन्सल्टंट म्हणून अमेरिकेत कार्यरत आहे. गेल्या वर्षभरात जगभर पसरलेल्या कोव्हिड १९ च्या साथीमध्येही त्याने महत्वाचे योगदान दिले आहे व देत आहे.
शालेय जीवनापासून जबरदस्त ज्ञानलालसा व वाचनाची आवड असल्याने, अर्थातच लेखन करण्याची ऊर्मीही दीर्घकाळ मनात होती. वैद्यकीय प्राध्यापिकेच्या पूर्णवेळ व्यस्ततेमुळे वेळ न मिळाल्याने ती सुप्तच राहिली होती. ज्या ज्ञानलालसेतून त्यांनी अध्यापिकेचे करीअर निवडले, त्याच ज्ञानलालसेतून अखेरीस वैद्यकीय क्षेत्रातून निवृत्तीनंर, उर्वरित जीवनाला एक वेगळी दिशा देत, आवडीचे काम करीत आनंदी राहण्याचे ठरवून त्या लेखनाकडे वळल्या. १९५५-१९६६ या दशकात शालेय शिक्षण मायबोली मराठीतून झाल्याने, अर्थातच ‘माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।’ असे संत ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेल्या मराठी भाषेशी त्यांचे घट्ट नाते आहे. तसेच वाचनाने समृद्ध झालेली त्या भाषेतील विपुल शब्दसंपदा त्यांच्याकडे असल्याने, त्यांनी प्रथम २००७ मध्ये ‘आहार व आरोग्य’ या विषयावर सर्वसामान्यांसाठी लिहिलेल्या एका मराठी ब्लॉगपासून सुरुवात केली. त्यानंतर सन २०१० पासून मराठीत सर्जनशील कल्पनारम्य लेखन सुरू केले आणि आज त्यांनी स्वत:चे रूपांतर एक नामवंत सर्जनशील लेखिकेमध्ये केले आहे. सन २०१४ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने छापील स्वरुपात प्रकाशित केलेली ‘कायापालट’ ही त्यांची पहिली मराठी कादंबरी. त्यानंतर अज्ञातवास (कादंबरी), अनाकलनीय (गूढकथासंग्रह), आद्यकर्मी इलिजाबेथ (चरित्र), अंतरिक्षातून (अंतरिक्षकथा) विलक्षण पृथ्वीप्रदक्षिणा (साहसी फुगेयान प्रवास), हरवलेली (साहसी जलप्रवास), अजब मुलांच्या गजब कथा (किशोरकथा) इत्यादी सह अनेक मराठी पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांची बहुतेक सर्व पुस्तके ॲमेझॉन किंडलवर ई-बुक्स म्हणून उपलब्ध आहेत.
त्यांचे सर्वात मोठे लेखनकार्य, ज्याला magnum opus म्हणता येईल ते आहे, डॉ. इलिझाबेथ ब्लॅकवेल या एकोणिसाव्या शतकातील एका आद्यकर्मी (पायोनिअर Pioneer) स्त्रीचे चरित्र. ज्या एकोणिसाव्या शतकात स्त्रियांना प्राथमिक शिक्षणही उपलब्ध नव्हते व वैद्यकीय शिक्षण तर वर्जच होते, त्या शतकाच्या मध्यात इलिजाबेथ ब्लॅकवेल या स्त्रीने सर्व सामाजिक अडचणींविरुद्ध प्रयत्न करून वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला व आधुनिक वैद्यकाची ती जगातील ‘प्रथम महिला डॉक्टर’ बनली. अशा या इलिझाबेथच्या जीवनकथेने, तशाच परिस्थितीतून गेलेल्या स्नेहलच्या मनाची पकड घेतली नसेल तरच आश्चर्य! अशा या आद्यकर्मी इलिजाबेथच्या मराठी चरित्राला स्नेहलशिवाय कोण अधिक चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकेल! तिच्या कथेपासून प्रेरित होऊन, स्नेहलने तिचे जीवनचरित्र मराठीत लिहिले आहे. या चरित्रामुळे मराठी तरुणांच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळेल आणि त्यांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल अशी त्यांना आशा आहे.